Friday, December 27, 2024 02:01:38 AM

Narendra Modi
पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा

पंतप्रधान  नरेंद्र मोदी शनिवार १३ जुलै २०२४ रोजी मुंबईला भेट देणार आहेत. संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला, पंतप्रधान  मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील.

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा

मुंबई : पंतप्रधान  नरेंद्र मोदी शनिवार १३ जुलै २०२४ रोजी मुंबईला भेट देणार आहेत. संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला, पंतप्रधान  मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील. या कार्यक्रमात  ते २९ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, संध्याकाळी सातच्या सुमाराल पंतप्रधान मोदी जी -ब्लॉक , वांद्रे कुर्ला संकुल,  मुंबई येथे आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील.

मुंबई दौऱ्यात पंतप्रधान १६ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा हा दुहेरी ट्युब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. ज्यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग  आणि ठाण्याकडील  ठाणे - घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल. प्रकल्पाची एकूण लांबी ११.८ किमी आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास १२ किमीने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे १ तासाची बचत होईल. 

पंतप्रधान मोदी ६३०० कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड  प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी  करणार आहेत. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व  द्रुतगती महामार्ग दरम्यान  रस्ता जोडणे ही गोरेगाव मुलुंड लिंक रोड  प्रकल्पाची कल्पना आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड  प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे ६.६५ किलोमीटर आहे आणि पश्चिम उपनगरांना नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वे शी  थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

यावेळच्या दौऱ्यात पंतप्रधान कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेच्या कामाची तसेच नवी मुंबईमध्ये तुर्भे येथे गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलच्या  कार्याची पायाभरणी देखील करणार आहेत.कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी रेल्वे गाड्या यांच्या वाहतुकीचे पृथक्करण करण्यात मदत होईल. या पुनर्रचनेनंतर अधिक गाड्यांची वाहतूक हाताळण्यासंदर्भात यार्डाच्या क्षमतेत वाढ होईल, रेल्वेगाड्यांची कोंडी होणे कमी होईल आणि गाड्यांचे परिचालन करण्यासंदर्भात यार्डाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. नवी मुंबई येथील गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल 32,600 चौरस मीटर्सहून अधिक क्षेत्रावर उभारले जाणार असून हे टर्मिनल स्थानिक जनतेसाठी अतिरिक्त रोजगार संधी निर्माण करेल आणि सिमेंट तसेच इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी आवश्यक अतिरिक्त टर्मिनलची गरज पूर्ण करेल.

मुंबई भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवे फलाट (प्लॅटफॉर्म) तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील फलाट क्र.१० आणि ११ चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण देखील होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसमधील नवे, अधिक लांबीचे फलाट जास्त लांबीच्या गाड्यांसाठी सुयोग्य ठरतील आणि प्रत्येक गाडीत अधिक प्रवाशांची सोय होईल. तसेच प्रवाशांच्या वाढलेल्या वाहतुकीचे नियमन करण्याची रेल्वे स्थानकाची क्षमता देखील यामुळे सुधारेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्र.१० आणि ११ यांची लांबी ३८२ मीटरने वाढवण्यात आली असून या भागावर सावलीसाठी आच्छादन तसेच गाडी धुण्याच्या दृष्टीने या भागातील रेल्वे रुळांवर विशेष सोय देखील केलेली आहे. या विस्तारामुळे या फलाटाची क्षमता तब्बल २४ डब्यांची गाडी उभी राहण्याइतकी वाढली आहे.

मुंबई दौऱ्यात सुमारे ५६०० कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते केला जाणार आहे. हा एक परिवर्तनकारी अंतर्वासिता कार्यक्रम असून १८ ते ३० या वयोगटातील तरुणांना कौशल्य सुधार आणि उद्योगाभिमुखतेच्या संधी देऊन तरुणांमधील बेरोजगारीची समस्या सोडवणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

मुंबई भेटीदरम्यान पंतप्रधान वांद्रे -कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटीला  (आयएनएस) देखील भेट देतील आणि तेथील आयएनएस टॉवर्सचे  उद्घाटन करतील. वांद्रे -कुर्ला संकुलात उभारलेली ही नवी इमारत मुंबईत आधुनिक तसेच कार्यक्षम कार्यालयीन जागेची आयएनएसच्या सदस्यांची गरज पूर्ण करेल आणि मुंबईतील वर्तमानपत्र उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करेल.


सम्बन्धित सामग्री