नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रात ७६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यात नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील दहा सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्किल्स, विद्या समीक्षा केंद्र महाराष्ट्र यांचेही उद्घाटन झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतक्या वेगाने, इतक्या मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रांमध्ये विकास झालेला नाही. महायुती सरकारच्या काळात हा विकास होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्रात वेगाने पायाभूत विकास सुरू आहे. हे सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महान विभूतींच्या आशीर्वादाने सुरू आहे; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत. हरियाणाच्या मतदारांनी देशातील जनतेच्या मनाचा कल स्पष्टपणे दाखवून दिला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. दोन कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा हरियाणात मिळालेला विजय ऐतिहासिक असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. वैयक्तिक लाभासाठी विभाजनवादी राजकारण करणाऱ्या आणि मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करणे आणि हिंदूंना जातींमध्ये विभागणे यासाठी धडपडत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. समाज तोडण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील जनता नाकारेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
ठाणे, अंबरनाथ, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भांकदरा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील असे ते म्हणाले. राज्यातील दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे आणखी ९०० वैद्यकीय जागा तयार होतील. यामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे सहा हजार होईल असे पंतप्रधान म्हणाले. लाल किल्ल्यावरुन भाषण करताना देशात वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून नव्याने ७५ हजार जागा निर्माण करणार असल्याचे जाहीर केले होते. राज्यात सुरू झालेली वैद्यकीय महाविद्यालये ही त्या घोषणेशी संबंधित असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सरकारने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असेही ते म्हणाले.
सध्याच्या सरकारला विकास आणि वारसा अशा दोन्ही बाबी महत्त्वाच्या वाटतात. शिर्डी विमानतळ परिसरात नवीन टर्मिनल, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण ही कामं केल्याचे पंतप्रधान म्हणाले. साई बाबांच्या भक्तांना शिर्डी विमानतळ परिसरातील नव्या टर्मिनलचा खूप फायदा होईल. जगभरातून शिर्डीला येणे सोपे होईल. सोलापूर विमानतळामुळे शनी शिंगणापूर, तुळजाभवानी तसेच कैलास मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांना भेट देणे अधिक सुलभ होईल. महाराष्ट्राच्या पर्यटनविषयक अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळून रोजगाराच्या नवनव्या संधी देखील निर्माण होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. विमानतळामुळे शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदा, द्राक्ष, पेरू आणि डाळिंब यांसारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सहज पोहोचवता येतील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क निम्म्याने कमी केले . सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील शेतकऱ्यांना मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांच्या वाढलेल्या किमतीचा फायदा मिळावा, यासाठी रिफाइन्ड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील सीमा शुल्कात लक्षणीय वाढ केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कापड उद्योगाला सरकार ज्या प्रकारे मदत करत आहे त्याचा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असेही ते म्हणाले.