नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था वार्षिक आठ टक्के दराने वाढत आहे. विकास होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काही जणांकडून संसदेतील पदाचा दुरुपयोग होत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे. राजकीय हेतूने नाही तर देशहितासाठी लढणे आवश्यक आहे, असेही मोदी म्हणाले. राजकीय हेतूने संसदेच्या कामकाजात अडथळे आणणे योग्य नाही; या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंधळी काँग्रेसला सुनावले.
आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. अर्थमंत्री सीतारमण लोकसभेत मंगळवार २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण केले जाईल. यंदा लोकसभेच्या निवडणुकीमुळे फेब्रुवारी २०२४ मध्ये लेखानुदान सादर करण्यात आले. आता पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.