नवी दिल्ली : युक्रेन, पश्चिम आशियात सध्या सुरू असलेला संघर्ष आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. शोल्झ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. येथील हैदराबाद हाउसमध्ये मोदी आणि शोल्झ यांनी भेट झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उभय नेत्यांनी युक्रेन, पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले. संघर्ष सुरू असलेल्या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जर्मनी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यास तयार असल्याचेही या प्रसंगी सांगण्यात आले.