Tuesday, December 03, 2024 10:47:12 PM

Narendra Modi
मुख्यमंत्री ते पंतप्रधान, मोदींची सत्तापदावरील २३ वर्षे

मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा सत्तेतला २३ वर्षांचा प्रवास मोदींनी केला. हा प्रवास अद्याप सुरू आहे. सत्तेत २३ वर्षांपासून असलेल्या मोदींची कारकिर्द वादळी आणि धडाकेबाज आहे.

मुख्यमंत्री ते पंतप्रधान मोदींची सत्तापदावरील २३ वर्षे

नवी दिल्ली : 'मै नरेंद्र दामोदरदास मोदी...' असे म्हणत मोदींनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून आतापर्यंत मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा सत्तेतला २३ वर्षांचा प्रवास मोदींनी केला. हा प्रवास अद्याप सुरू आहे. सत्तेत २३ वर्षांपासून असलेल्या मोदींची कारकिर्द वादळी आणि धडाकेबाज आहे. ते सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. 

मुख्यमंत्री म्हणून गुजरात या राज्याचा विकास करणे ते पंतप्रधान म्हणून देशाचा विकास करणे ही दोन्ही आव्हाने मोदींनी लिलया हाताळली आहेत. आजही देशाविदेशातले चाहते मोदींच्या दूरदृष्टीचे कौतुक करतात. विकास साधणे, जनतेचा विश्वास संपादीत करणे या सगळ्याच बाबतीत मोदी प्रभावी ठरत असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

मोदींच्या नेतृत्वात भाजपाने २००१ पासून पुढील १३ वर्षात तीन वेळा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. सातत्याने विजय मिळवणाऱ्या मोदींनी जनतेचा विश्वास संपादीत केला. याच कारणामुळे लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या वेळेस मोदी एकाचवेळी उत्तर प्रदेशच्या  वाराणसी आणि गुजरातच्या बडोदा या दोन मतदारसंघांमधून उभे राहिले. दोन्ही मतदारसंघांतून मोदी विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. यानंतर ठरल्याप्रमाणे मोदींनी बडोद्याची जागा सोडली. पण गुजरातच्या जनतेचे मोदींवरील प्रेम कमी झाले नाही. 

मोदींच्या कल्याणकारी योजना आणि त्यांचे विकासाचे गुजरात प्रारुप या दोन्हीचे जगभर कौतुक झाले. यातूनच प्रेरणा घेत पंतप्रधान झाल्यावर मोदींनी देश पातळीवर कल्याणकारी योजना आणि विकास योजना राबवण्याला प्राधान्य दिले. हे करत असतानाच पंतप्रधान मोदींनी भारताचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध सुधारणे, देशाला संरक्षणासाठी अधिकाधिक सक्षम आणि आत्मनिर्भर करणे यालाही महत्त्व दिले. 

पंतप्रधान मोदींच्या पहिल्या अर्थात २०१४ च्या शपथविधीवेळी सार्क देशांचे प्रतिनिधी, २०१९ च्या शपथविधीवेळी बिमस्टेक देशांचे प्रतिनिधी आणि २०२३ च्या शपथविधीवेळी हिंद महासागरातील भारताच्या शेजारी देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नेपाळ, श्रीलंका, मालदीव या देशांना संकटात भारताने मोलाची मदत केली. कोविड काळात भारताने जगातील अनेक देशांना विनामूल्य कोविड प्रतिबंधक लस पुरवली. हे करणाऱ्या भारताने मोदींच्या नेतृत्वात अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानमध्ये एकदा सर्जिकल स्ट्राईक आणि एकदा एअर स्ट्राईक केला. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत वाढली. भारत म्हणजे विश्वासार्हता, संकटात मदत करणारा मित्र आणि स्वसंरक्षणासाठी कठोर भूमिका घेणारा देश अशी प्रतिमा निर्माण झाली. याचा मोदींना पंतप्रधान म्हणून कारकिर्दीत प्रचंड फायदा झाला. 

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, देशात नागरिकता सुधारणा कायदा लागू करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आसाममध्ये नागरिकांच्या नोंदणीसाठी एनआरसी प्रक्रिया सुरू करणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे, कोविड काळात देशातील परिस्थिती प्रभावीरित्या हाताळणे, भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवणे आदी विविध कामांमुळे मोदींच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. सध्या मोदींचा एक देश  एक निवडणूक हा निर्णय चर्चेत आहे. या व्यतिरिक्त मोदी सरकारचे वक्फ सुधारणा विधेयक पण चर्चेत आहे. 

नरेंद्र मोदी त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे सतत चर्चेत आहेत. प्रत्येक आव्हानाला संधी समजून त्या संधीचे सोने करणे यामुळे नरेंद्र मोदींचे नेतृत्व अधिकाधिक प्रभावी होत असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करतात.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo