पुणे : राज्यात मुले- मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात पुणे शहर अव्वल असल्याचं देखील समोर आल आहे. पुणे शहरात मुले- मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्शवभूमीवर आता पोलीस प्रशासन ऍक्शन मोड वर आल्याचं दिसून येत आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसेच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ' 'ऑपरेशन मुस्कान- 13 सुरु करण्यात येणार आहे.
कसे होईल 'ऑपरेशन मुस्कान'- 13?
या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा येथेे शहरातील सर्व परिमंडळातील पोलिस ठाणेनिहाय टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम पुणे शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना भेट देऊन सदर मोहिमेबाबत पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून संबंधित मोहिमेबाबत माहिती देणार आहेत.
या मोहिमेतंर्गत पुणे शहर, तसेच परिसरातून बेपत्ताा झालेली मुले, तसेच तरुणींचा शोध घेण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे आता ज्या पालकांचे पाल्य बेपत्ता आहेत त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू खुलणार आहे.