मुंबई : घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात राष्ट्रवादी अजित पवार गटाने अखेर वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. हे चिन्ह अजित पवार गटाला दिलेले असले तरी ते न्यायप्रविष्ट असल्याचे पुढील ३६ तासात वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला दिले होते. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठापुढे घड्याळ चिन्हाच्या गैरवापराचा मुद्दा आला असता हे आदेश देण्यात आले. घड्याळ हे चिन्ह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी तीस वर्षे संबंधित आहे, विरोधक याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला होता. दरम्यान, न्यायालयात शक्ती खर्च करण्यापेक्षा प्रचारावर लक्ष केंद्रित करा, असा सल्लाही न्यायालयाने दोन्ही गटांना दिला.
राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट, जाहिरात प्रसिद्ध
सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची माहिती देणारी जाहिरात ३६ तासांत प्रसिद्ध करण्याचे निर्देश अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. या निर्देशाचे पालन करत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने वर्तमानपत्रांमध्ये मराठी भाषेत घड्याळ चिन्हाबाबत निर्णय न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली. घड्याळ चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी मिळाली असल्याचा मजकूर जाहिरातीत आहे.
भारत निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि गजराचे घड्याळ (घड्याळ) हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना दिली आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणात अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. सध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि गजराचे घड्याळ (घड्याळ) हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना मिळाली आहे.