Friday, June 28, 2024 09:03:09 PM

Pawar
राशपचा पिपाणीला विरोध, निवडणूक आयोगाला पत्र

राशपने विधानसभा निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.

राशपचा पिपाणीला विरोध निवडणूक आयोगाला पत्र

पुणे : लोकसभा निवडणुकीत राशपचे उमेदवार असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आलं. या उमेदवारांनी ३० ते ४० हजार मतं घेतली. दिंडोरीत तर पिपाणी चिन्हाला लाखभर मतं मिळाली. यामुळे सावध झालेल्या राशपने विधानसभा निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. 

शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळालं. नवं चिन्ह असल्यानं मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी वेळ लागला. त्यातच तुतारीसदृश्य पिपाणी चिन्ह काही अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं. त्याचा फटका राशपच्या उमेदवारांना बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांकडे असलेली साताऱ्याची लोकसभा पक्षाला गमवावी लागली. इथे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे ३२ हजार ७७१ मतांनी पराभूत झाले. इथे पिपाणी चिन्हावर लढलेल्या संजय गाडे नावाच्या अपक्ष उमेदवारानं ३७ हजार मतं घेतली. या पार्श्वभूमीवर तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी चिन्ह यांच्यात असलेल्या साधर्म्याचा फटका बसू नये यासाठी राशपने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. राशपची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली तर विधानसभेला कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे संभ्रमातून पिपाणीला होणारं मतदान टळेल. याचा फायदा राशपला होऊ शकतो.


सम्बन्धित सामग्री