नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी समर्थ यांची मूर्ती हाती घेऊन काढलेला फोटो ट्वीट केला आहे. फोटोत दिसत असलेली स्वामींची मूर्ती स्मृतीचिन्ह म्हणून पंतप्रधान मोदींना मिळाली आहे. ही मूर्ती डॉ. भरत बलवली यांनी मोदींना भेट म्हणून दिली आहे. स्वामींची ही मूर्ती भेट म्हणून स्वीकारण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. 'स्वामींचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रती असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करेन'; असे मोदींनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
स्वामी कायम त्यांच्या शिष्यांना 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असे सांगतात. लवकरच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना भिऊ नका हाच संदेश देत प्रचारासाठी प्रेरणा देत असल्याची चर्चा फोटोच्या निमित्ताने समाजमाध्यमात सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीत स्वामींचा जाहीर अपमान करण्याचा प्रकार घडला होता. नंतर भाजपाच्या राजेश शिरवाडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि स्वामींचा अपमान करणाऱ्या ज्ञानेश महारावने माफी मागितली. पवारांच्या उपस्थितीत स्वामींचा अपमान करणाऱ्याने माफी मागितली. यानंतर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भाजपाच्या राजेश शिरवाडकर यांचे अनेकांनी कौतुक केले. या पार्श्वभूमीवर मोदींचा स्वामींची मूर्ती हाती घेतलेला फोटो समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.