नागपूर : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर, संत-महंत आणि धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नागपूरमधील एका चहावाल्यालाही या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
फडणवीसांचे चाहते गोपाल बावनकुळे
गोपाल बावनकुळे हे नागपूरच्या रामनगर परिसरात टी स्टॉल चालवतात. ते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असून, त्यांच्या टी स्टॉलवर फडणवीसांचा फोटो लावलेला आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा चहा प्यायला येण्याचे आमंत्रण त्यांनी याआधी फडणवीसांना दिले होते. फडणवीसांच्या कार्यालयातून शपथविधी सोहळ्यासाठी खास निमंत्रण मिळाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
शपथविधीच्या दिवशी मोफत चहा वाटप
शपथविधी सोहळ्याला जाण्याचा आनंद व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, "5 डिसेंबरला माझ्या चहा स्टॉलवर दिवसभर मोफत चहा वाटणार आहे. फडणवीसांनी नेहमीच आमच्यासारख्या सामान्य लोकांना महत्त्व दिले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही स्वखर्चाने जात आहोत."
महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी
मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, आणि इतर नेत्यांनी तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सामान्य चहावाल्याच्या निमंत्रणामुळे या सोहळ्याला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.