मुंबई : मुस्लिम पुरुषाला एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे, मुस्लिम पुरुषाने एकापेक्षा अधिक विवाह केले असतील तर महाराष्ट्र विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत त्यांची नोंदणी करण्याची मुभा देखील त्याला आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. ठाणे महानगरपालिकेने अल्जेरियन महिलेशी केलेल्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्यास नकार दिल्याने याचिकाकर्त्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी केली होती. त्यावर, निर्णय देताना न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्वाळा दिला.