Saturday, August 03, 2024 07:58:48 AM

MLC Election 2024
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या आमदारांची पंचतारांकीत हॉटेलांमधून राहण्याची व्यवस्था केली

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या आमदारांची पंचतारांकीत हॉटेलांमधून राहण्याची व्यवस्था केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांचा पंचतारांकीत पाहुणचार सुरू आहे. 

यावेळी विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा निश्चित होताच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

महायुतीकडून भाजपाचे पाच, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले आहेत. काँग्रेस, राशप आणि शिउबाठा यांनी प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे.

  1. भाजपाचे पाच उमेदवार : पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, अमित गोरखे
  2. शिवसेनेचे दोन उमेदवार : भावना गवळी, कृपाल तुमाने
  3. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर

महाविकास आघाडीचे तीन उमेदवार

  1. काँग्रेस : प्रज्ञा सातव
  2. राशप : शेकापचे जयंत पाटील राशपकडून
  3. शिउबाठा : मिलिंद नार्वेकर

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक एक या पद्धतीने कोटा ठरतो. राज्य विधानसभेच्या एकूण जागा २८८ आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ २७४ वर आले आहे. विधानसभेच्या एकूण जागा २७४, रिक्त जागा ११ + १ म्हणजेच १२ ने भागाकार केला तर २२.८३३ हे उत्तर येतं. त्यामुळे विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. 

यावेळी २३ मतांचा कोटा असल्यामुळे महायुतीला नऊ उमेदवारांच्या विजयासाठी २०७ मतांची आवश्यकता आहे. महायुतीकडे सध्या २०१ आमदारांची मते आहेत. यात भाजपाच्या १०३, शिवसेनेच्या ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३९ आमदारांची मते आहेत. या व्यतिरिक्त तेरा अपक्ष आणि लहान पक्षांच्या नऊ आमदारांची मते महायुतीकडे आहेत. एमआयएमचे दोन आमदार आणि माकपचा एक आमदार तटस्थ राहणार आहे. काँग्रेसच्या ३७, राशपच्या १३, शिउबाठाच्या १५ आमदारांच्या मतांसह शेकापच्या एका आमदाराचे मत आणि एका अपक्ष आमदाराचे मत महाविकास आघाडीकडे आहे. मविआकडे ६७ मते आहेत आणि त्यांना तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी ६९ मतांची आवश्यकता आहे. थोडक्यात मविआला दोन आणि महायुतीला सहा मतांची कमतरता भासत आहे. 

राखीव मतांवरुन काँग्रेस आणि शिउबाठात मतभेद

काँग्रेसने प्रज्ञा सातव यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी आणि दगाफटका टाळण्यासाठी काही मते राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे शिउबाठामध्ये नाराजी आहे. अतिरिक्त मते काँग्रेसने मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठी ठेवावी, अशी शिउबाठाची मागणी आहे. पण काँग्रेसने शिउबाठाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. 

मविआला मते फुटण्याचा भीती

मविआच्या नेत्यांना मते फुटण्याची भीती वाटत आहे. ही भीती मविआकडून माध्यमांसमोर व्यक्त झाली आहे. यामुळे मते फुटली तरी उमेदवार जिंकून यावेत यासाठीचे नियोजन सुरू आहे. 

मविआचे दोन उमेदवार चिंतेत

विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी मविआकडून तीन उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी दोन उमेदवार चिंतेत आहेत. या उमेदवारांना पराभवाची भीती सतावत आहे. राशपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले शेकापचे जयंत पाटील आणि शिउबाठाचे मिलिंद नार्वेकर या दोन उमेदवारांकडे निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी मते नाहीत. यामुळे मित्रांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय अनलंबून आहे. याच कारणामुळे मविआचे दोन उमेदवार चिंतेत आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्याकडे पुरेशी मते आहेत. यामुळे सातव यांचा विजय निश्चित समजला जात आहे. 


सम्बन्धित सामग्री