Saturday, August 03, 2024 03:07:28 PM

MLC Election
आमदारांचा पंचतारांकीत पाहुणचार

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक जवळ येताच प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांची पंचतारांकीत हॉटेलांमधून राहण्याची व्यवस्था केली आहे

आमदारांचा पंचतारांकीत पाहुणचार

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक जवळ येताच दगाफटका होऊ नये म्हणून प्रमुख राजकीय पक्षांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांची पंचतारांकीत हॉटेलांमधून राहण्याची व्यवस्था केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांचा पंचतारांकीत पाहुणचार सुरू आहे. 

यावेळी विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

महायुतीकडून भाजपाचे पाच, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले आहेत. काँग्रेस, राशप आणि शिउबाठा यांनी प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे.

  1. भाजपाचे पाच उमेदवार : पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, अमित गोरखे
  2. शिवसेनेचे दोन उमेदवार : भावना गवळी, कृपाल तुमाने
  3. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर

महाविकास आघाडीचे तीन उमेदवार

  1. काँग्रेस : प्रज्ञा सातव
  2. राशप : शेकापचे जयंत पाटील राशपकडून
  3. शिउबाठा : मिलिंद नार्वेकर

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक एक या पद्धतीने कोटा ठरतो. राज्य विधानसभेच्या एकूण जागा २८८ आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ २७४ वर आले आहे. विधानसभेच्या एकूण जागा २७४, रिक्त जागा ११ + १ म्हणजेच १२ ने भागाकार केला तर २२.८३३ हे उत्तर येतं. त्यामुळे विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. 

यावेळी २३ मतांचा कोटा असल्यामुळे महायुतीला नऊ उमेदवारांच्या विजयासाठी २०७ मतांची आवश्यकता आहे. महायुतीकडे सध्या २०१ आमदारांची मते आहेत. यात भाजपाच्या १०३, शिवसेनेच्या ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३९ आमदारांची मते आहेत. या व्यतिरिक्त तेरा अपक्ष आणि लहान पक्षांच्या नऊ आमदारांची मते महायुतीकडे आहेत. एमआयएमचे दोन आमदार आणि माकपचा एक आमदार तटस्थ राहणार आहे. काँग्रेसच्या ३७, राशपच्या १३, शिउबाठाच्या १५ आमदारांच्या मतांसह शेकापच्या एका आमदाराचे मत आणि एका अपक्ष आमदाराचे मत महाविकास आघाडीकडे आहे. मविआकडे ६७ मते आहेत आणि त्यांना तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी ६९ मतांची आवश्यकता आहे. थोडक्यात मविआला दोन आणि महायुतीला सहा मतांची कमतरता भासत आहे. 


सम्बन्धित सामग्री