मुंबई : अतिवृष्टीमुळे मागील आठवड्यात अंधेरी पूर्वेतील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या चौकशीचा अहवाल महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला. दुर्घटनास्थळ व परिसर हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमएमआरसीएल) कंत्राटदार एल अॅण्ड टी यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथील त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारीदेखील एल अॅण्ड टी तसेच एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला आहे. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा दोन प्राधिकरणांमध्ये जुंपणार आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती.