Saturday, October 05, 2024 04:04:46 PM

Marathi
दरवर्षी ३ ऑक्टोबरला अभिजात भाषा दिन

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या घटनेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ३ ऑक्टोबर रोजी राज्यात अभिजात भाषा दिन साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

दरवर्षी ३ ऑक्टोबरला अभिजात भाषा दिन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या घटनेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ३ ऑक्टोबर रोजी राज्यात अभिजात भाषा दिन साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मोदी सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. घटस्थापनेच्या दिवशी झालेल्या या निर्णयामुळे राज्यात आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मान्यवरांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. 

भाषेचे प्राचीनत्व सिद्ध करणारे १५०० ते २००० वर्षांपासूनचे साहित्य, काव्य, ग्रंथसंपदा, शिलालेख आणि अन्य पारंपरिक पुराव्यांच्या आधारे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराकरिता तसेच मराठी भाषेशी संबंधित संशोधनाकरिता केंद्राकडून निधी उपलब्ध होईल. महाराष्ट्रात तसेच अन्य राज्यांतील विद्यापीठांमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र अध्यासनांची निर्मिती केली जाईल. मराठी भाषेचे शिक्षण देण्यासाठी वर्ग सुरू केले जातील. 

केंद्राने आधीच तामीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. आता मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.


सम्बन्धित सामग्री