जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे संध्याकाळी पाच वाजता उपोषण स्थगित करुन रुग्णालयात दाखल होणार आहेत. मागील नऊ दिवसांपासून जरांगे उपोषण करत होते. तब्येत खालावल्यामुळे जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने सांगितले म्हणून उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जाणार आहे, असे जरांगे यांनी समर्थकांना सांगितले.
महायुती सरकारने मराठा समाजाला मागास ठरवून आरक्षण दिले. या आरक्षणाला काही जणांनी आव्हान दिले. सध्या हा विषय न्यायालयात आहे. यामुळे या विषयात कोणताही नवा निर्णय घेणे शासनासाठी तांत्रिककृष्ट्या कठीण झाले आहे. पण जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले. यामुळे शासन काय करणार याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र उपोषण सुरू केल्यापासून अवघ्या नऊ दिवसांत जरांगेंनी त्यांचा निर्णय बदलला आहे. उपोषण स्थगित करुन उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जाणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले.