Friday, September 20, 2024 02:24:16 AM

Semiconductor Plant
नवी मुंबईत मराठी उद्योगपतीचा सेमीकंडक्टर प्रकल्प

एक मराठी माणूस सेमीकंडक्टर प्रकल्प उभारत आहे, याचा अभिमान वाटतो. महाराष्ट्र शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नवी मुंबईत मराठी उद्योगपतीचा सेमीकंडक्टर प्रकल्प

वाशी : एक मराठी माणूस सेमीकंडक्टर प्रकल्प उभारत आहे, याचा अभिमान वाटतो. महाराष्ट्र शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते नवी मुंबईतील महापे एमआयडीसी येथे सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर,  उद्योग मंत्री उदय सामंत, आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोडणकर उपस्थित होते. 

महायुतीचे शासन दिलेला शब्द पाळते. लाडकी बहीण योजना यशस्वी करुन दाखवली. या योजनेप्रमाणेच राज्यात सुरू असलेल्या अनेक कल्याणकारी योजनाही यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने जलद गतीने कामे सुरु आहेत. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई मधील दोन तासाचे अंतर आता अवघ्या वीस मिनिटांवर आले आहे. महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प आम्ही साकार करीत आहोत. राज्य शासनाने दाओसमध्ये पाच लाख कोटीच्या उद्योग करारांवर सह्या केल्या आहेत. लोकांच्या हातांना निश्चित काम मिळेल. सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात अतिशय आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. या तंत्रज्ञानामुळे राज्यात अर्थव्यवस्थेला चालना मिळेल; असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था मोदी सरकार येण्याआधी जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर होती. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आणली. आता देशाची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आणण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. या मोहिमेत महाराष्ट्र शासन भरीव योगदान देण्यासाठी काम करत आहे; असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

देशातला पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात

देशातला पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात सुरू होत आहे. एक मराठी उद्योगपती हा प्रकल्प उभारत आहे. ही सुरुवात महत्त्वाची आहे. आपण डिझाईनच्या क्षेत्रात प्रगती केली पण रिअल हार्डवेअरच्या क्षेत्रात जगाच्या तुलनेत कमी पडत होतो. आता ही कमतरता दूर करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ही चिप खूप महत्वाची आहे. 

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी आवश्यक असलेल्या चिप देशातच तयार होणे हिताचे आहे. सध्या चिपसाठी भारत परकीयांवर अवलंबून आहे. पण नवी मुंबईतल्या प्रकल्पाच्या माध्यमातून हे अवलंबित्व कमी करण्यास सुरुवात होत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

  1. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर प्रकल्पात ३६ हजार ५७३ कोटींची गुंतवणूक
  2. प्रकल्पात इस्त्रायल, स्पेन, इटली आणि फ्रान्स येथील कंपन्यांची गुंतवणूक 
  3. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स राजेंद्र चोडणकर या मराठी माणसाची कंपनी
  4. प्रकल्पात सचिन तेंडुलकर 'स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर'

सम्बन्धित सामग्री