नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी खासदार डेरेक ओ'ब्रायन यांना सुनावले. राज्यसभेत कामकाज सुरू असताना ओ'ब्रायन यांनी सभापतींकडे बघत आरडाओरडा केला. यानंतर धनखड यांनी खासदार डेरेक ओ'ब्रायन यांना सुनावले.
राज्यसभेत बोलताना सभापतींना उद्देशून बोलण्याचा नियम आहे. सभापती हे राज्यसभेतले सर्वोच्च पद आहे. यामुळे राज्यसभेत सभापतींसमोर कसे वागावे, कसे बोलावे याचे नियम आणि संकेत आहेत. या नियमांचे आणि संकेतांचे उल्लंघन करत खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनी आरडाओरडा केला होता. याआधीही अनेकदा खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनी संसदीय कामकाजाच्या नियम आणि संकेतांचे उल्लंघन केले होते. याच कारणामुळे ओ'ब्रायन यांनी आरडाओरडा केल्यानंतर सभापती जगदीश धनखड यांनी खासदार डेरेक ओ'ब्रायन यांना सुनावले.
विरोधकांची मागणी
राज्यसभेत पत्रिकेत नमूद कार्यक्रमानुसार कामकाज सुरू झाले. विरोधकांनी अचानक विनेश फोगाट या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत ५० किलो गटात विनेश फोगाट अंतिम फेरीत पोहोचली होती. पण अतिरिक्त वजनामुळे नियमानुसार पंचांनी विनेशला अपात्र ठरवले. यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. याच मुद्यावर चर्चा करावी अशी विरोधकांची मागणी होती. यावर बोलताना ऑलिम्पिकचे नियम खेळाडूंना बांधील आहेत. पण विनेशच्या बाबतीत जे घडले त्यामुळे पूर्ण देश दुःखी असल्याचे सभापती म्हणाले. हरयाणा सरकारने अपात्र ठरुनही विनेशला पदक विजेत्या खेळाडू सारखाच मान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सभापतींनी सांगितले. यानंतर सभापतींनी पत्रिकेत नमूद कार्यक्रमानुसार कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सभापतींच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी ओ'ब्रायन यांनी आरडाओरडा केला.