मुंबई : उद्योगपती रतन टाटांची प्रकृती गंभीर आहे. टाटा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार घेत आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रतन टाटांना कृत्रिम श्वलन यंत्रणेवर अर्थात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
कोण आहेत रतन टाटा ?
रतन नवल टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. ते १९९० ते २०१२ या काळात टाटा समुहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते. तसेच टाटांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते. रतन टाटांना २००८ मध्ये पद्मविभूषण आणि २००० मध्ये पद्मभूषम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रतन टाटा हे २८ डिसेंबर १९३७ रोजी जन्मलेले टाटा घराण्याचे वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत. टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी रतन टाटांना दत्तक घेतले. रतन टाटांनी कॉर्नेल विद्यापीठातील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी घेतली. तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शास्त्र शिकून घेतले. त्यांचे शिक्षण १९७५ मध्ये पूर्ण झाले. पण त्याआधीच १९६१ मध्ये रतन टाटा टाटा स्टीलमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले होते. ते कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून काम करत होते. पुढे १९९१ मध्ये जेआरडी टाटा निवृत्त झाले. जेआरडींनी निवृत्ती घेण्याआधीच रतन टाटांना उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. रतन टाटांच्या कार्यकाळात टाटा समुहाच्या सामर्थ्यात वाढ झाली. त्यांच्या कार्यकाळात समुहाने अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड खरेदी केले. बलाढ्य कंपन्यांना समुहात विलीन केले.