Thursday, March 06, 2025 08:44:00 PM

लंडन : खलिस्तान्यांनी जयशंकर यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करत तिरंगा फाडला, भारताकडून प्रक्षोभक कारवायांचा तीव्र निषेध

भारताने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या यूके दौऱ्यादरम्यान फुटीरतावाद्यांच्या प्रक्षोभक कारवाया, सुरक्षेतील उल्लंघनाचा आणि स्वातंत्र्याच्या गैैरवापराचा निषेध केला आहे.

लंडन  खलिस्तान्यांनी जयशंकर यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करत तिरंगा फाडला भारताकडून प्रक्षोभक कारवायांचा तीव्र निषेध

लंडन : भारताने गुरुवारी म्हटले की, त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या यूके दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील उल्लंघनाचे फुटेज पाहिले आहे आणि या फुटीरतावादी आणि अतिरेक्यांच्या "प्रक्षोभक कारवायां"चा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की भारत अशा घटकांकडून लोकशाही स्वातंत्र्यांचा गैरवापर केल्याबद्दल निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये यजमान सरकारकडून त्यांच्या राजनैतिक जबाबदाऱ्या पूर्णपणे पाळण्याची अपेक्षा करतो.

लंडनमधील चॅथम हाऊसच्या बाहेर खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली. बुधवारी (यूकेच्या स्थानिक वेळेनुसार) जयशंकर यांनी ज्या ठिकाणी चर्चेत भाग घेतला होता, त्या ठिकाणी निदर्शक झेंडे आणि लाऊडस्पीकर घेऊन इमारतीबाहेर जमले आणि जयशंकर यांनी कार्यक्रमस्थळाच्या आत चर्चेत भाग घेतला तेव्हा त्यांनी घोषणाबाजी केली.

जानेवारीच्या सुरुवातीला, खलिस्तान समर्थकांचा एक गट लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करण्यासाठी जमला होता. त्यांनी यापूर्वी लंडनमधील हॅरो शहरातील एका सिनेमागृहावर हल्ला केला होता आणि कंगना राणौत अभिनीत चित्रपट "इमर्जन्सी" चे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा - दारुड्या माकडांबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? त्यांचं 'सोशल ड्रिंकिंग'ही असतं आणि जास्त ढोसली तर त्यांनाही होतो 'हँगओव्हर'!

जयशंकर यांचा 6 दिवसीय दौरा
जयशंकर हे ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. थिंक टँक कार्यक्रमात त्यांनी काश्मीरपासून ते परस्पर शुल्क आणि ट्रम्पच्या धोरणांपर्यंतच्या मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केले. पण या कार्यक्रमानंतर ते इमारतीतून बाहेर येताच, तिथे उपस्थित असलेले खलिस्तानी झेंडे घेऊन समर्थक आधीच घोषणाबाजी करत होते.

जयशंकर त्यांच्या गाडीकडे जात असताना, एका खलिस्तानी निदर्शकाने धावत जाऊन त्यांच्या गाडीचा रस्ता अडवला. यादरम्यान एका खलिस्तानी निदर्शकाने तिरंगा फाडला. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला तेथून दूर नेले. जयशंकर त्यांच्या भेटीदरम्यान प्रथम लंडनला पोहोचले, जिथे त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली.

अशा पद्धतीनेच सर्व प्रश्न सुटतील : जयशंकर
दरम्यान, लंडनमधील चर्चेवेळी एस. जयशंकर यांना एका पत्रकाराने काश्मीर प्रश्न भारत कसा सोडवणार आहे? तिथे शांतता कशी प्रस्थापित करणार? असा प्रश्न विचारला. यावर जयशंकर म्हणाले, 'काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडत आहे. 

एस. जयशंकर म्हणाले, 'आधी आम्ही जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं आर्टिकल370 हटवलं, त्यापाठोपाठ निवडणुका घेतल्या. आता पाकव्याप्त काश्मीरची वेळ आहे.' मला वाटतं की आपण काश्मीरचा तो भाग परत येण्याची वाट पाहत आहोत, जो बेकायदेशीरपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तो हिस्सा भारताकडे परत येताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता स्थापित होईल, असे मोठे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलं.

परराष्ट्र मंत्री म्हणाले, 'मला वाटतं की काश्मीरचा पाकिस्तानने बळकावलेला भाग परत भारतात कधी येणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आल्यावर तिथले सर्व प्रश्न सुटतील याची मी तुम्हाला खात्री देतो.'

पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या
ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर रिकामे करण्याबाबत किंवा भारताला परत करण्याबाबत केलेल्या विधानावर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. जयशंकर यांच्या पीओकेबाबतच्या विधानावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून दावा केला की, भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचे विधान जमिनीवरील वास्तव दर्शवत नाही. यानंतर पाकिस्तानने उलट भारतालाच जम्मू आणि काश्मीर रिकामा करून पाकिस्तानला देण्यास सांगितले. दरम्यान, भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरबद्दल एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले होते. लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकच्या एका कार्यक्रमात, जयशंकर यांना पाकिस्तानी पत्रकार निसार यांनी विचारले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर करू शकतात का? यावर जयशंकर म्हणाले की, जर पाकिस्तानने काश्मीरच्या (पीओके - पाकव्याप्त काश्मीर) भागावरील आपला ताबा सोडला तर समस्याच राहणार नाही. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी पीओके रिकामे करण्याबाबत केलेल्या विधानानंतर आता पाकिस्तानने ही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - Egg Shortage In America 2025 : अमेरिकेत रेंट-द-चिकन स्कीम; म्हणजे काय आणि कशासाठी?


सम्बन्धित सामग्री