ठाणे : पंतप्रधान मोदी यांनी ठाण्याच्या कार्यक्रमातून ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. यात मुंबईत कुलाबा ते सीप्झ सांताक्रुझ या मार्गावर धावणाऱ्या भूमिगत मेट्रो ३ अर्थात अॅक्वा लाईनचाही समावेश होता. हे उद्घाटन होताच समाजमाध्यमात 'देवेंद्र आहे तर शक्य आहे', 'देवेंद्र आहे तर गर्वहरण करणारी मेट्रो ३ शक्य आहे' अशा स्वरुपाचे संदेश व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कौतुकाने इन्फ्रामॅन, मेट्रोमॅन अशी बिरुदावली नेटकरी लावू लागले आहेत.
मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मुंबईची लोकसंख्या २ कोटी ४० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात काँग्रेसच्या काळात अपेक्षित पायाभूत सुविधांचा विकास झाला नाही. यामुळे मुंबईकरांचे प्रश्न अधिकाधिक गंभीर झाले. या परिस्थितीचा अंदाज देवेंद्र फडणवीस यांना २०१४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आला. यानंतर फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधला आणि मुंबईसह संपूर्ण राज्याच्या पायाभूत समस्यांवर उपाय म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ही विकासकामं झपाट्याने व्हावी आणि जनतेला या सोयीसुविधांचा परेपूर लाभ व्हावा यासाठी पायाला भिंगरी लावून काम केले. राज्यातल्या आणि केंद्रातल्या वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधून येणारी प्रत्येक अडचण लवकर दूर करण्यासाठी जातीने लक्ष घातले. पायाभूत विकास करताना निर्माण होणारे कायदेशीर प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, सामाजिक आणि आर्थिक गुंता यावर तज्ज्ञांशी सल्लमसलत करुन आणि राजकीय चातुर्याचा वापर करुन उपाय केले. राजकीय इच्छाशक्ती ते बाबूगिरी अशा सर्व अडथळ्यांना पार केले.
फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा मुंबईत केवळ ११ किमी अंतरावर मेट्रो धावत होती. आता मुंबईत ६० किमी पेक्षा जास्त भागात मेट्रो धावते आहे आणि जवळपास १५० किमी. पेक्षा अधिकचे काम प्रगतीपथावर आहे आणि तेवढेच काम प्रस्तावीत आहे. मुंबई मेट्रो ३ साठी केंद्रीय स्तरावरील परवानगी असो की आरे कारशेड विरोधातील खरी-खोटी आंदोलने, न्यायालयीन लढा प्रत्येक टप्प्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालत अडचणी दूर केल्या. फडणवीस यांचे अडचणी दूर करून काम मार्गी लावण्याचे कसब केंद्रीय नेतृत्वालाही भावले. यामुळेच पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे कौतुक केले.
उद्धव यांच्या नेतृत्वात मविआचे सरकार असताना अडीच वर्ष मेट्रो ३ प्रकल्प रखडला होता. पण महायुती सरकार सत्तेत येताच मेट्रो ३ चे काम वेगाने पुन्हा सुरू करण्यात आले. मविआने मेट्रो ३ च्या कारशेडलाच विरोध म्हणून काम रखडवले होते. महायुती सत्तेत येताच फडणवीस यांनी सर्व अडचणी दूर केल्या आणि कारशेडचे काम सुरू झाले. मेट्रो ३ प्रकल्प पुन्हा मार्गी लागला. पंतप्रधान मोदी यांनी ही बाब जनतेसमोर जाहीरपणे सांगितली. मविआच्या अडीच वर्षांच्या स्थगितीमुळेच मेट्रो ३ प्रकल्पाच्या खर्चात १४ हजार कोटींची वाढ झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जागतिक पायाभूत सुविधा निर्मितीची इच्छाशक्ती असो, कमी कालावधीत डीपीआर तयार करणे असो की केंद्र आणि राज्य पातळीवर परवानगी असो फडणवीस प्रत्येक समस्येवर कायद्याच्या चौकटीत राहून उपाय शोधून काढतात. न्यायालयीन लढाईत स्वत: वकील असल्याने मार्ग काढणे असो की राजकीय विरोध खोडून काढणे असो प्रत्येक बाजू देवेंद्र फडणवीस यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्याप्रमाणे मैदानात उतरून लढवली आहे. यामुळेच अशक्य वाटू लागलेली मेट्रो ३ अखेर प्रत्यक्षात आली आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यामुळेच 'देवेंद्र आहे तर कुणाचे तरी गर्वहरण करणारी मेट्रो ३ शक्य आहे' असा मविआला टोला लगावणारा संदेश समाजमाध्यमात व्हायरल होऊ लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांना कौतुकाने इन्फ्रामॅन, मेट्रोमॅन अशी बिरुदावली नेटकरी लावू लागले आहेत.