मराठवाडा - विदर्भात पावसाचा जोर
मराठवाडा - विदर्भ : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाल्याने या प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. जिल्ह्यात शनिवार सायंकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
बाभूळगाव तालुक्यातील खडकसावंगाजवळील बेंबळा धरणाच्या मागील बाजूस दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे. निर्धारित केलेल्या क्षमतेपेक्षा पाण्याची पातळी आणखी वाढू नये याची दक्षता म्हणून बेंबळा जलसिंचन प्रकल्प विभागाने आज सकाळी धरणाचे दहा दरवाजे उघडले. यापूर्वीही धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आल्याने आता एकूण दहा दरवाजे ५० सेंमीने उघडून प्रतिसेकंद २८८ घ.मी. वरून ४८० घ. मा. के पाण्याचा विसर्ग बेंबळा नदीपात्रात सुरू आहे. धरणात येणाऱ्या विसर्गावरून दरवाजांची संख्या कमी जास्त केली जाणार आहे. शासनाकडुन नदीकाठी असलेल्या गावांना आपल्या स्तरावरून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.