बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर बीडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आहे.
बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लागल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर भाजपा नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती केली गेली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा होती. बीडमध्ये मुंडे भाऊ-बहीण दोघांनाही पालकमंत्रीपद मिळाले. त्यानंतर धनंजय मुंडे पालकमंत्री होणार की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार अशा चर्चा होत्या. कारण याआधी पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री राहिलेल्या आहेत. त्यांनी 5 वर्षे बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर धनंजय मुंडे यांनी साडेचार वर्षे बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाची चर्चा होती. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री मिळाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडची राजकीय समीकरणं बदलली आहेत. देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.