कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर प्रामुख्याने मविआचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघांनी शेतकऱ्यांकडून गायीचे दूध खरेदी करण्याच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. 3.5 फॅट, 8.5 एस. एन. एफ. चे गायीचे दूध 30 रुपये लिटर दराने खरेदी केले जाईल. याआधी हा दर 33 रुपये होता. दर कपातीच्या निर्णयाची गुरुवारपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. हा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी दूध संघ संघटनेच्या बैठकीत झाला. या निर्णयानुसार गोकुळ, वारणा, राजारामबापू आदी पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघ शेतकऱ्यांकडून गायीचे दूध खरेदी करण्याच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात करतील. दूध संघांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय, मविआचा दारुण पराभव
विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला. भाजपाने 132, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत मविआने 46 जागा जिंकल्या. ठाकरे गटाने 20, काँग्रेसने 16 आणि शरद पवारांच्या गटाने 10 जागा जिंकल्या. इतर 12 जागांवर जिंकले. विधानसभा निवडणुकीत मविआचा दारुण पराभव झाला. मराठा आरक्षणाच्या मुद्याचा प्रभाव पडेल आणि शेतकरी वर्ग पाठिशी उभा राहील, असे मविआला वाटत होते. प्रत्यक्षात उलट परिस्थिती निर्माण झाली. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघांनी शेतकऱ्यांकडून गायीचे दूध खरेदी करण्याच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली.
खरेदी दरातील कपातीबाबत दूध संघांची अधिकृत भूमिका
दूध संघांनी प्रसारमाध्यमांना अधिकृत प्रतिक्रिया देताना स्पर्धात्मक दर देण्यासाठी दूध खरेदीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. सध्या बाजारात गाय आणि म्हैस यांचे दूध नियमित आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. दूध भुकटी आणि लोणी यांच्या विक्रीच्या दरात नजिकच्या काळात वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे दूध खरेदीच्या दरात कपात केल्याचे दूध संघांनी सांगितले.