मुंबई : मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाच्या पहिल्या यादीत आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "मी भाजपच्या सर्व नेत्यांचं आणि केंद्रीय नेतृत्वाचं आभार मानतो कारण त्यांनी मला जवळपास सातव्यांदा उमेदवारी जाहीर केले आहे. मला विश्वास आहे की यावेळी मला संपूर्ण राज्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी मतं मिळणार आहेत. लोक मला पुन्हा निवडून देतील याबाबत माझ्या मनामध्ये कुठल्याही शंका नाही."
"जळगाव जिल्हा हा महायुतीचाच बालेकिल्ला आहे आणि येथे आम्ही दुसऱ्या कुणाचीही जागा निवडून येऊ देणार नाही. मलकापूर आणि जळगाव जिल्ह्यातील 11 अशा बाराच्या बारा जागा आम्ही निवडून आणू."
"सर्वात चांगला निकाल हा संपूर्ण महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राचाच असेल. सर्व आमदार आम्ही उत्तर महाराष्ट्रातून महायुतीचे निवडून देऊ," असं महाजन म्हणाले.
ते म्हणाले, "मला नाही वाटत कुठेही बंडखोरी होईल. सर्वांनी युद्ध धर्म पाळावा. कुठे बंडखोरी होणार नाही याची दक्षता आणि काळजी आम्ही घेऊ."
"कोणाला आव्हान द्यायचं आहे, त्यांनी द्यावं. समोरच्या पक्षाकडे तर उमेदवार सुद्धा नव्हत्या. कोणी उमेदवार आणि तिकीट घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तयार नव्हतं. त्यांनी आमचाच उमेदवार पळवलेला आहे. आता घोडामैदान समोर आहे. कुणाला किती मत मिळतात हे आपण बघू," अशी टिपण्णी महाजन यांनी केली.
"मात्र या ठिकाणी लोकांनी निश्चय केलेला आहे की सर्वात जास्त महाराष्ट्रातल्या विक्रमी मतांनी जाणाऱ्या जागा निवडून येतील. पक्षषष्ठी आणि राज्यातले नेतृत्व त्याबाबत निर्णय घेईल," असेही ते म्हणाले.
"सोमवारी कोर कमिटीची बैठक बोलवलेली आहे आणि त्या मीटिंगसाठी मी आता मुंबई निघालेलो आहे," असे महाजन यांनी सांगितले.