मुंबई : वसई परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या सुमारे 300 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश भाजपचे संघटन पर्व प्रभारी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी हा पक्षप्रेवश झाला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे उपस्थित होत्या.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने डिसेंबरपासून सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली असून या मोहिमेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार याप्रमाणे जवळपास दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज, 5 जानेवारीला राज्यव्यापी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हेही वाचा : पोलिसांकडून खासदार सोनावणेंना धमकी
प्रदेश भाजपचे संघटन पर्व प्रभारी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. एकाच दिवशी 25 लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, नेते पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.
या विशेष सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथून करतील. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, नेते, आमदार ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त नागरिक भाजपशी जोडले जातील यासाठी प्रयत्न करणार आहेत. या मोहिमेबाबत प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता 250 पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असेही चव्हाणांनी नमूद केले.
हेही वाचा : पर्ण बनली रुबीना
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच संघटन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर भाजपाच्या विविध आघाड्या तसेच, प्रकोष्ठांनी नोंदणी मोहिमेसाठी कार्यशाळा घेतल्या होत्या. भाजप प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना बावनकुळे यांनी केली होती. या अनुषंगाने मोहिमेला अधिक गतिमान करून सक्रिय सहभागासाठी विशेष योजना आखल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.