Thursday, September 05, 2024 10:35:06 AM

Gadchiroli
'देशातील ३० टक्के पोलाद उत्पादन गडचिरोलीतून'

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरजागड येथे पोलाद प्रकल्पाचे भूमीपूजन झाले.

देशातील ३० टक्के पोलाद उत्पादन गडचिरोलीतून

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरजागड येथे पोलाद प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरजागडचा पोलाद प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर देशातील ३० टक्के पोलाद उत्पादन येथून होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

गडचिरोली जिल्हा माओवादी नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे प्रगतीच्या प्रवाहात मागे पडला होता. पण सुरजागड येथील पोलाद प्रकल्पामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागड पोलाद प्रकल्पातून आठ दशलक्ष टन तर लॉईड्स प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर महाराष्ट्रात ३० टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पोलाद प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य माणसांची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातीन जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आदिवासींचे दैवत असलेले ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचे उत्खनन होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चार्मोर्शीतसुद्धा ३५ हजार कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून वीस हजार इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ, रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे.  यासोबतच येथे शिक्षण हब तयार करण्यात येत आहे. येथील मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात १७० कोटींचे इनोव्हेशन सेंटर तयार होत आहे, तसेच शासनाने उच्च व तंत्र शिक्षण घेणार्‍या मुलींना शंभर टक्के फी सवलत तर मुलांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाने मुंबईपर्यंत जोडण्यात येणार आहे. यासोबतच चार्मोशी ते काकीनाडा बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यातील जनसामान्यांचा विकास होण्याकरिता आज आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाला साकडे घालत असल्याचे फडणवीस म्हणाले.


सम्बन्धित सामग्री