Thursday, September 12, 2024 05:35:26 PM

Flag Code
तिरंगा कसा फडकवावा ? काय आहे यंदाची थीम ?

यंदा भारत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. तिरंगा कसा फडकवावा ? काय आहे यंदाची थीम ? जाणून घेऊया...

तिरंगा कसा फडकवावा  काय आहे यंदाची थीम
tiranga

१३ ऑगस्ट, २०२४, मुंबई : भारतीयांचा राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्यदिवस. यंदा भारत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. विविध शाळा, महाविद्यालयं, सरकारी आणि खाजगी संस्था, रहिवासी संकुल तसंच घरोघरी अभिमानाने तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी ध्वजावतरण केलं जातं तर, १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केलं जातं. यात नेमका फरक काय आहे ? आणि ध्वजारोहणाविषयी ध्वज संहिता काय सांगते ? जाणून घेऊया... 

यंदाची स्वातंत्र्य दिनाची थीम 

यावर्षी स्वातंत्र्य दिन २०२४ ची अधिकृत थीम 'विकसित भारत' आहे. ही थीम २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात बदलण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतीक आहे.

ध्वजावतरण आणि ध्वजारोहण यातील फरक  

ध्वजसंहितेनुसार २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी तिरंगा खांबावर शीर्षस्थानी बांधला जातो आणि तिथूनच अवतरित केला जातो म्हणजेच फडकवला जातो, तर १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी तिरंगा खालून दोरीने वर खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो, याला ध्वजारोहण असं म्हणतात. यामागचं कारणं असं की, जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिश सरकारचा ध्वज उतरवून भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. त्यामुळे १५ ऑगस्टला खांबावर तिरंगा वर नेऊन फडकवला जातो.

ध्वजसंहितेतील ध्वजारोहणाचे नियम

- तिरंगा फडकवताना जागा योग्य असावी. 
- सर्वाना स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी तिरंगा फडकवावा. 
- तिरंगा फाटलेला किंवा चुरगळलेला नसावा. 
- तिरंगा फडकवताना शीर्ष स्थानी भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा रंग असावा. तसंच मध्यभागी निळं अशोकचक्र असावं.   
- तिरंगा आयताकृती असावा. त्याच्या लांबी आणि रुंदीचं माप हे ३:२ असं असावं. 
- ध्वजारोहणच्या वेळी तिरंगा नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे आणि विधीपूर्वक उतरवावा.  
- तसंच ध्वजारोहणाच्या वेळेस आणि उतरवण्याच्या वेळेस बिगुलाचा वापर करावा. 
- जर तिरंग्यासोबत इतर ध्वज लावायचे असतील तर ते स्वतंत्र काठीवर आणि तिरंग्यापेक्षा कमी उंचीवर लावावेत. 
- कोणत्याही परिस्थितीत तिरंग्याचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. 
- तसंच, जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असेल तेव्हा वक्त्याचं तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे तिरंगा लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो वक्त्या मागच्या भिंतीवर वरच्या बाजूस लावावा. 
- आता महत्वाचा मुद्दा असा की, हल्ली सर्रास तिरंग्याच्या पताका लावल्या जातात किंवा तिरंग्याच्या चित्राचे कपडेही परिधान केले जातात पण, ध्वजसंहितेप्रमाणे तिरंग्यांचं तोरण, गुच्छ, पताका किंवा इतर कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करण्यासाठी परवानगी नाहीये.  
- तसंच, तिरंगा किंवा तिरंग्याचं चित्र असलेले कपडे परिधान करायलाही परवबनगी नाहीये. तिरंगा फक्त देशसेवेत शहीद झालेल्या सैनिकांच्या अंतयात्रेत त्यांचं पार्थिव लपेटण्यासाठी वापरला जातो. आणि त्यानंतर तो रीतसर पद्धतीने काढूनही घेतला जातो. 

ध्वजसंहितेत झालेले बदल

काळानुसार ध्वजसंहितेत काही बदलही करण्यात आले आहे. २००२ च्या ध्वजसंहितेनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवण्याची परवानगी होती पण २०२२ पासून सुरु झालेल्या हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत आता २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी आहे. तसंच, याअगोदर यंत्रानं आणि पॉलिस्टरनं तिरंगा बनवण्याची परवानगी नव्हती पण आता यंत्रापासून तयार केलेलं पॉलिस्टर कापूस, लोअर, रेशीम किंवा खादी पासूनही तयार करण्यात आलेला तिरंगा वापरता येणारे. 

ध्वजसंहितेतील शिक्षा 

ध्वज संहितेत ध्वजसंहितेचं  उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षाही नमूद केली आहे. त्याप्रमाणे, ध्वज संहितेचं उल्लंघन हे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध कायदा १९७१ अंतर्गत दंडनीय आहे. ध्वज संहितेनुसार तिरंग्याचा अपमान करणं जसं की, तिरंग्याच्या कोणत्याही भागाला जाळणं, नुकसान करणं, तिरंग्याचा शाब्दिक अपमान करणं. किंवा इतर कोणत्याही प्रकारे अपमान करणं यामुळे शिक्षा आणि दंड बसू शकतो. जाणून बुजून एखाद्याने तिरंग्याचा अपमान केला तर त्याला ३ वर्ष कारावासाची किंवा दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 
 


सम्बन्धित सामग्री