Thursday, November 21, 2024 02:04:14 PM

Trump
ट्रम्प - पुतिन यांची फोनवर चर्चा

अमेरिकेचे निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन बातचीत केली.

ट्रम्प - पुतिन यांची फोनवर चर्चा

फ्लोरिडा : अमेरिकेचे निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. अमेरिकेत २० जानेवारी रोजी नव्या अध्यक्षांचा शपथविधी होणार आहे. याआधीच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धबंदी व्हावी अशी इच्छा ट्रम्प यांनी पुतिन यांच्याकडे व्यक्त केली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी परस्पर चर्चेतून आणि सामंजस्यातून मार्ग काढावा पण युद्ध आणखी वाढवू नये, अशीही इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी फ्लोरिडातील घरातून पुतिन यांना फोन केला होता. याआधी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल अभिनंदनासाठी फोन केला होता. यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली होती. यानंतर ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. 

ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर सकारात्मक चर्चा झाली. ट्रम्प यांनी शांततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले; असे रशियाने अधिकृत प्रसिद्धपत्रकात नमूद केले आहे. फोनवरील चर्चेबाबत सविस्तर माहिती देणे दोन्ही नेत्यांनी टाळले आहे. पण या चर्चेमुळे रशिया आणि युक्रेन यांच्यात लवकरच युद्धबंदी होईल; अशी चर्चा सुरू झाली आहे. 

रशिया - युक्रेन युद्ध

युक्रेन नाटोमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत आहे आणि अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटोच्या फौजा युक्रेनमध्ये तळ उभारणार आहेत. हे सगळे रशियाच्या सुरक्षेला धोकादायक आहे. यामुळे स्वसंरक्षणासाठी रशिया विशेष लष्करी कारवाई करत आहे; असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले. रशियाने २०२२ मध्ये २३ - २४ फेब्रुवारीच्या रात्री युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाई सुरू केली. याला उत्तर म्हणून युक्रेनने रशियाच्या सीमेजवळच्या भागात लष्करी कारवाई केली. दोन्ही बाजूचे सैन्य कधी आक्रमक तर कधी बचावात्मक पवित्रा घेत संघर्ष करत आहे. या युद्धात रशियाने युक्रेनचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. युद्ध अद्याप सुरू आहे. 

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक निकाल २०२४

डोनाल्ड ट्रम्प, रिपब्लिकन पार्टी - ३१२ इलेक्टोरल व्होट्स - विजय
कमला हॅरिस, डेमोक्रॅटिक पार्टी - २२६ इलेक्टोरल व्होट्स - पराभव


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo