Thursday, September 12, 2024 05:59:35 PM

Eknath Shinde
राज्याच्या विकासासाठी, नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज्याच्या विकासासाठी नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी  राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते मुंबईत ७८ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने ध्वजारोहण केल्यानंतर राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात बोलत होते. 

मागील दोन वर्षात राज्य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल, गोरगरीबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रती असणारी बांधीलकी दाखवून दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवून जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरु आहे. त्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची वाटचाल त्या दिशेने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृषी, शिक्षण, ऊर्जा, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, पर्यटन, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास,  पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत.  राज्यात पंधरा दशलक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. राज्याची लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली आहे. यातून येत्या पाच वर्षात तीस हजार कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळणार आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. गेल्या दोन वर्षात पाच लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करार झाले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत तर आपण देशात प्रथम आहोत. त्या माध्यमातून अडीच लाख रोजगार निर्मिती आपण केली आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा चौदा टक्के आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात आपले राज्य क्रमांक एकवर आहे. विदेशी पर्यटकांची पसंतीही महाराष्ट्र असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

सुमारे दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे राज्यात सुरु आहेत.  समृद्धी महामार्गा सारखा गेम चेंजर असणाऱ्या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा पूर्ण होऊन नागपूर ते मुंबई पूर्ण वाहतूक लवकरच सुरु होणार आहे. पायाभूत सुविधांसोबतच गोरगरीब, दुर्बल, वंचित यांना विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करुन घेतले जात आहे. राज्य शासनाच्या सात पथदर्शी (फ्लॅगशिप)  योजनांनी राज्याच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून तब्बल ४ कोटी लाभार्थींना लाभ दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनापासून महिला भगिनींना मिळण्यास सुरुवात होईल. याशिवाय, युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण आणि भरीव स्टायपंड, गोरगरीब, दुर्बलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर,  शेतकऱ्यांना वीज सवलत, मुलीना संपूर्ण व्यवसायिक शिक्षण मोफत आणि सगळ्या धर्मातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या तीर्थस्थळांची यात्रा करत यावी म्हणून योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.  अठरा वर्षाच्या मुलीला १ लाख रुपये देणारी महत्वाची “लेक लाडकी” योजनाही सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून ३०० कोटी रुपये मदत केली आहे. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी आणि आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची  स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता  या सगळ्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी,  महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या संस्था मागास, दुर्बल, गरीब युवकांसाठी अनेक योजना घेऊन काम करताहेत. अल्पसंख्याकांसाठी मार्टी संस्था सुरु केली. मातंग समाजासाठी आर्टी संस्था सुरु केली. यातून राज्य शासनाची संवेदनशीलताच दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

 गेल्या दोन वर्षांत विविध विभागांच्या माध्यमातून ४४ हजार कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देत आहोत. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी वैनगंगा- नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिल्याने पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचित होणार आहे, गेल्या दोन वर्षात १२५ जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री