२८ सप्टेंबर, २०२४, संभाजीनगर : मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे छत्रपती संभाजी नगरातील हर्सूल तलाव तुडुंब भरला असून या ठिकाणी होण्यासाठी गेलेला एक मुलगा पोहताना पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. परंतु, तेथील नागरिकांना ही बाब तत्काळ निदर्शनास आली. त्यानंतर तेथे असलेल्या एका रिक्षाचालकाने आणि काही नागरिकांनी त्याला योग्य पद्धतीने सीपीआर (कार्डिओ पल्मनरी रेसॅसिटेशन) दिला. त्यामुळे बेशुद्ध पडलेल्या मुलाची हृदयक्रिया सुरू झाली. त्यावेळी त्याच्या फुफ्फुसातील पाणी बाहेर निघाले. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. दरम्यान, तलाव तुडुंब भरल्याने या ठिकाणी पोहण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि तरूण येतात. मात्र, तेथे सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने या तलावाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.