धुळे : साक्री तालुक्यातील भोनगांव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
चॉकलेटवर दर्शविलेली एक्सपायरी डेट अद्याप संपलेली नसली तरीही, यामध्ये जिवंत अळ्या आढळल्यामुळे शाळेतील आरोग्य सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. या घटनेनंतर, पालकांनी प्रशासनावर टीका करत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीरता ओळखून योग्य कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.