आता भारताबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचा उत्साह
जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने राज्यात साजरी करण्यात आली. साता समुद्रापार लंडनमध्ये शिव जयंती मोठ्या दिमाखात पार पडली. आता भारताबाहेरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. लंडनमध्ये धिरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनने तिसऱ्यांदा मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला.
लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्च हॉटेल मधील सभागृहात भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून अभिवादन केले. शिवाय, लंडनमधील मार्बल आर्च परिसरात शिवजयंतीनिमित्त रस्त्यावर भव्य रॅली काढण्यात आली. या सोहळ्यात मराठमोळ्या संस्कृतीचा उत्तम मिलाफ पाहायला मिळाला.
शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते आणि त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, लंडन येथील वेस्ट मिनिस्टर काउंसिलच्या मार्बल आर्च हार्ड स्टँड येथे प्रथमच ढोल-ताश्यांचा गजर दुमदुमला. ही ऐतिहासिक घटना होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त लंडनच्या हृदयस्थानी अशी परंपरा पाहायला मिळाली.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी यश सुतार, सौरभ खेड़कर, कौस्तुभ रामेकर, तुषार पाटील, स्वप्निल गावडे, तुषार मौले, यशवंत गुरव, प्रथमेश मोरे, आशुतोष ढमाले व अभिषेक देवरुखकर यांनी अतोनात मेहनत घेतली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा बहुमान लंडनमधील भारतीय नागरिकांना मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.