मुंबई : राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्याचा निर्णय एसटीच्या संचालक मंडळाने घेतला असून आज कर्मचाऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी भेट रक्कम मंजूर करण्यात आली होती. परंतु आचारसंहितेमुळे ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळत आहे. महामंडळानेच बोनससाठी केली 52 कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव महामंडळाने सरकारकडे पाठवला होता.
दिवाळी बोनस मिळण्यासाठीचा 52 कोटींचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाने आचारसंहितेपूर्वी सरकारडे पाठवला होता. त्यानंतर महामंडळाकडून वारंवार विचारणा देखील करण्यात आली. 31 ऑक्टोबरला एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला होता. मात्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली होती. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस रखडला होता. ऐन दिवाळीत त्यांना बोनस न मिळाल्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती.
आता राज्यात विधानसभा निवडणुक पार पडली. आचारसंहिता संपुष्टात आली. एस.टी. कर्मचाऱ्यांनी दिवाळी भेट मिळण्यासाठी हालचाली सुरू केल्या. एसटी कर्मचारी संघटना आणि एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर 29 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांना प्रती व्यक्ती 6 हजार दिवाळी बोनस भेट देण्याबाबत सांगण्यात आले. गेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 5 हजार इतकी रक्कम दिवाळी भेट देण्यात आली होती. यावर्षी त्यात एक हजारांची वाढ करण्यात आली आहे. यंदा एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6 हजार दिवाळी बोनस मिळणार आहे.