मुंबई : भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मागील निवडणुकीत ज्या जागांवर शिवसेना लढली होती. त्या पाच जागा यावेळी भाजपाने स्वतःच्या पारड्यात पाडून घेतल्या आहेत. या पाच जागांवर त्यावेळी शिवसेना उमेदवार पराभूत झाले होते. भाजपाने हाच मुद्दा अधोरेखित करून त्या पाच जागा स्वतःकडे खेचून घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जागा आपल्याला मिळाव्यात असा आग्रह धरला होता. मात्र, जागावाटपात भाजपाने जिंकून येण्याचे सुत्र अग्रभागी ठरवल्यामुळे शिवसेनेला या जागांवर पाणी सोडावे लागले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. मात्र बैठकीत यावर तोडगा निघाला नसल्याचे समजते.
या जागा कोणत्या ?
नालासोपारा, उरण, धुळे शहर, अचलपूर, देवली या आहेत शिवसेनेच्या पाच जागा
नालासोपारा - बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांचा पराभव केला होता.
उरण - अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर भोईर यांचा पराभव केला होता.
धुळे शहर - शिवसेनेच्या हिलाल अण्णा माळी यांचा एमआयएमचे उमेदवार फारुक शाह यांनी पराभव केला होता.
अचलपूर - शिवसेनेच्या सुनीता फिस्के यांचा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पराभव केला होता.
देवली - शिवसेनेचे समीर देशमुख यांचा काँग्रेसचे उमेदवार रणजीत कांबळे यांनी पराभव केला होता.