मुंबई : मागील काही दिवसांपासून बदलापूर अत्याचार प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणी शाळेच्या दोन संस्थापकांना अटक करण्यात आली आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोन संस्थापकांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. आरोपींची पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणी दोन दिवसांपूर्वी शाळेच्या संस्थापकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आरोपींना अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत अटक करायचे नाही असे पोलिसांनी ठरवले आहे का ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. यानंतर बुधवारी २ ऑक्टोबर रोजी आरोपींना अटक करण्यात आली.
बदलापूरमधील शाळेत चिमुरड्यांवर अक्षय शिंदे या सफाई कामगाराने अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात या घटनेचा निषेध नोंदवला गेला. काही दिवसानंतर आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या गाडीतून जात असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावत गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत पोलिसांकडून अक्षयवर गोळी झाडण्यात आली. चकमकीत अक्षय ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अक्षय शिंद चकमक प्रकरणी चौकशीचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.