संभाजीनगर :- संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका विद्यार्थिनीने कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात छळाच्या तक्रारीमुळे वातावरण तापले आहे. ही विद्यार्थिनी महोत्सवासाठी जळगावला गेली असताना, रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून संबंधित कर्मचाऱ्याने तिला त्रास दिला. विद्यार्थिनीने १६ मे रोजी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनीची तक्रार निकाली काढत कंत्राटी कर्मचाऱ्याला अभय दिले. समितीने विद्यार्थिनी विद्यापीठाशी संलग्न नसल्याचे सांगत तक्रारीची जबाबदारी झटकली.
या निर्णयामुळे विद्यार्थिनी आणि अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. गुरुवारी (२२ ऑगस्ट) अभाविपने कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. अभाविपने या प्रकरणात कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने अभाविप कार्यकर्त्यांविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विद्यार्थिनीला न्याय मिळावा, यासाठी अभाविपने आंदोलन छेडले असून, विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे, आणि पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.