Thursday, September 19, 2024 01:21:42 PM

Atishi Marlena Singh
आतिशी मार्लेना सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आम आदमी पार्टीच्यावतीने मुख्यमंत्रिपदी आतिशी मार्लेना सिंग यांची एकमताने निवड झाली.

आतिशी मार्लेना सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आम आदमी पार्टीच्यावतीने मुख्यमंत्रिपदी आतिशी मार्लेना सिंग (४३) यांची एकमताने निवड झाली. आतिशी मार्लेना सिंग या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी भाजपाच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी हाताळली आहे. सुषमा स्वराज ५२ दिवस तर शीला दीक्षित १५ वर्षे आणि २५ दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. आतिशी मार्लेना सिंग लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

दिल्ली विधानसभेच्या आमदार असलेल्या आतिशी मार्लेना सिंग यांनी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय, महिला व बालकल्याण, शिक्षण अशा वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. 

आतिशी मार्लेना सिंग यांची राजकीय कारकिर्द

  1. आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्य
  2. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभव
  3. दिल्ली विधानसभेच्या २०२० पासून आमदार, दक्षिण दिल्लीतील कालकाजी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी
  4. केजरीवाल सरकारमध्ये २०२३ पासून कॅबिनेट मंत्री
  5. दिल्लीच्या मुख्यमंत्री 

दिल्ली विधानसभा निवडणूक - कालकाजी विधानसभा मतदारसंघ - २०२०

  1. आतिशी मार्लेना सिंग, आम आदमी पार्टी - एकूण मते ५५ हजार ८९७
  2. धरमबीर, भाजपा - एकूण मते ४४ हजार ५०४
  3. आतिशी मार्लेना सिंग ११ हजार ३९३ मतांनी विजयी

आतिशी मार्लेना सिंगच्या निवडीवर भाजपाची प्रतिक्रिया

  1. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आतिशीच्या रुपाने अरविंद केजरीवाल एक बाहुली आणून बसवत आहेत. आतिशीकरवी मद्य धोरण घोटाळ्यातील सर्व आरोपींच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचा डाव केजरीवाल आखत आहेत.
  2. आतिशीच्या आईवडिलांनी अतिरेकी अफझल गुरुला वाचवण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती. अफझल गुरु हा संसद हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला अतिरेकी होता. 
  3. दिल्लीच्या शिक्षणमंत्री म्हणून आतिशी पुरत्या अपयशी ठरल्या आहेत.
  4. आतिशीवर तथ्यहीन आरोप केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या याचिकवेर १९ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 
  5. आतिशीचे आडनाव मार्लेना आहे. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी आतिशीने स्वतःचे आडनाव सिंग असल्याचे सांगायला सुरुवात केली.

सम्बन्धित सामग्री