पुणे : पोर्शे अपघात प्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गैरसमजातून भूमिका घेतली, असे वकील असीम सरोदे म्हणाले. अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अगरवाल याच्या विरोधात पुणे पोलिसांनी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. आरोपी अल्पवयीन असला तरी १७ वर्ष ८ महिन्यांचा आहे. त्याने केलेले कृत्य गंभीर स्वरुपाचे आहे यामुळे त्याच्या बाबतचे निर्णय हे प्रौढ समजून द्यावे अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. पण राहुल यांचा गैरसमज झाला. वेदांतला जामीन मिळाला त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात सौम्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवल्याच्या समजातून राहुल यांनी प्रतिक्रिया दिली; असे वकील असीम सरोदे म्हणाले.
पुण्याच्या पोर्शे अपघात प्रकरणी वेदांतचे वडील विशाल अगरवाल, बार मालक जयेश बोनकर, बार मालक जितेश शेवनी या तीन आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी वेदांत अगरवाल प्रकरणी बाल हक्क न्यायमंडळाचा निर्णय अद्याप आलेला नाही.