Friday, April 11, 2025 10:57:09 PM

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर दोन मुंबईकरांची नियुक्ती

केंद्र सरकारने देशातील वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च अशा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर (एनएमसी) मुंबईतील दोन वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर दोन मुंबईकरांची नियुक्ती

 

मुंबई : केंद्र सरकारने देशातील वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च अशा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर (एनएमसी) मुंबईतील दोन वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. डॉ. राजेंद्र बडवे आणि डॉ. अनिल डिक्कूड़ा अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही डॉक्टर कर्करोगतज्ज्ञ असून, त्यांनी अनेक दशके सेवा केली आहे. डॉ. बडवे टाटा मेमोरियल सेंटर येथे एमेरिटस प्राध्यापकपदावर कार्यरत आहेत, तर डॉ. डिक्रूझ मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे संचालक आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) बुधवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि स्वायत्त मंडळांच्या पदांवर विविध मातब्बरांची नियुक्ती केली. या नियुक्त्या चार वर्षांसाठी आहेत. वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाचे अध्यक्ष, डॉ. बी. एन. गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वीही आयोगात कार्यरत होते, तर तिरुवनंतपूरम येथील चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. संजय बिहारी यांची वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलचे संचालक (ऑन्कॉलॉजी विभाग) डॉ. अनिल डिक्कूझ यांची पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने टाटा मेमोरियल सेंटर येथील एमेरिटस प्राध्यापकपदावर कार्यरत असणारे डॉ. राजेंद्र बडवे यांची पदवी-पूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अर्धवेळ सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. ते ७० वर्षे वयापर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे लवकर होईल, तोपर्यंत ती लागू राहील, असे जाहीर केले आहे.


सम्बन्धित सामग्री