मुंबई : भारताचे माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. लंडनमधील उपचार पूर्ण झाल्यानंतर गायकवाड गेल्याच महिन्यात भारतात परतले होते. त्यांच्यावरील उर्वरित उपचार बडोदा येथे सुरू होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गायकवाड यांच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वीच आर्थिक मदत जाहीर केली होती.
अंशुमन गायकवाड यांच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.
प्रशिक्षक अंशुमन गायकवाड
अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ते १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले होते. त्यांनी १९७५ ते १९८७ या कालावधीत भारतीय क्रिकेट संघासाठी योगदान दिले. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या २०१ धावा ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च खेळी होती. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही त्यांनी व्यवस्थित सांभाळली.
गायकवाड यांच्याकडे ऑक्टोबर १९९७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात आली. ते सप्टेंबर १९९९ पर्यंत प्रशिक्षक होते. ते प्रशिक्षक असतानाच अनिल कुंबळेने विक्रमी कामगिरी केली होती. कुंबळेने १९९९ मधील पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतील एका डावात दहा बळी घेतले होते.