Saturday, October 05, 2024 04:50:25 PM

Awarded to 'EasyCheck' for diagnosis of Anemia
ॲनिमियाचे सहज निदान करणाऱ्या ‌'इझीचेक'ला पुरस्कार

ॲनिमियाचे सहज निदान करणाऱ्या ‌इझीचेकला अंजनी माशेलकर फाऊंडेशनचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

ॲनिमियाचे सहज निदान करणाऱ्या ‌इझीचेकला पुरस्कार

पुणे : सध्या भारतातील तीनपैकी दोन महिला आणि लहान मुले ॲनिमियाच्या (रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता)  सुप्त साथीने ग्रस्त आहेत. ॲनिमियावर उपचार करणे तुलनेने सोपे आहे परंतु त्याचे निदान करणे हीच मोठी समस्या आहे. पारंपरिक चाचणी पद्धती ही सुईचा वापर करून महागडी आणि दुर्गम भागातील लोकांना सहजपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे ॲनिमियाचे निदान केले जात नाही. यावर हमखास स्वस्तात निदान करणारे तंत्रज्ञान ‌इव्हीआयएक्स हेल्थ टेकचे संस्थापक पार्थ प्रतीमदास महापात्रा यांनी ‌‘इझीचेक' नावाने विकसित केले असून या तंत्रज्ञानाला यावर्षीचा (14 वा) अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन पुरस्कार देण्यात येणार आहे. अंजनी माशेलकर फाऊंडेशनच्या वतीने मुख्य विश्वस्त आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने ही घोषणा केली. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या फाऊंडेशनच्या वार्षिक सोहळ्यात नामवंत प्रमुख अतिथींच्या हस्ते महापात्रा यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे असेही डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
इव्हीआयएक्स कंपनीने ॲनिमियाच्या निदानासाठी एक अभूतपूर्व, अत्यंत परवडणारे, कुठेही नेता येणारे आणि वापरण्यास सोपे असे तंत्रज्ञान आणि उपकरण ‌इझीचेकच्या माध्यमातून विकसित केले आहे. या उपकरणामुळे सुई टोचून रक्त न घेता केवळ स्कॅनिंग करून हिमोग्लोबीन मोजता येते आणि त्यामुळे ॲनिमियाचे निदान तातडीने करणे शक्य होते. ग्रामीण भागातील कमी प्रशिक्षित व्यक्तींनादेखील हे उपकरण सहजपणे वापरता येऊ शकेल. ‌‘इझीचेक'ला एक मोबाईल ॲप जोडले असून हिमोग्लोबिनचे निदान आणि मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी  इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्डची सुविधादेखील उपलब्ध आहे. २०११ मध्ये स्थापन झालेल्या अंजनी माशेलकर फाऊंडेशनने आजपर्यंत अशा १५ क्रांतिकारक नवकल्पनांचा सन्मान केला आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि विचारवंत, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या मातोश्री अंजनी माशेलकर यांच्या ‌‘गरीबांसाठी विज्ञानाचा उपयोग करण्याच्या' इच्छापूर्तीच्या उद्देशाने हे फाऊंडेशन स्थापन केले आहे.आर्थिक विषमतेमुळे निर्माण झालेल्या असमानतेवर मात करून सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्वसमावेशक  नवकल्पनांना पुरस्कार देणे, त्यांना ही उत्पादने आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी बाजारात सहजपणे उपलब्ध करून देण्याकरिता पुढाकार घेणे हे या फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या पुरस्काराची घोषणा करताना डॉ. माशेलकर म्हणाले की, ॲनिमियामुळे गर्भवती मातांसाठी गंभीर समस्या निर्माण होते, तसेच मुलांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. भारतात जवळपास ६० टक्के महिला, किशोरवयीन मुली आणि लहान मुले ॲनिमियाने ग्रस्त असताना आपला देश त्याच्या क्षमतेच्या निम्म्याच प्रमाणात यावर काम करीत आहे. ‌इझीआरएक्सचे हे इझीचेक उपकरण म्हणजे  ‌‘गांधीवादी अभियांत्रिकी'चे एक नवीन उदाहरण असून त्यामुळे ‌‘स्वस्तात अधिक लोकांसाठी, अधिक' हा गांधीवादी अभियांत्रिकीचा मंत्र जपला जात आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. ‌‘इझीआरएक्स'ने भारतातील १७ राज्यांमध्ये ॲनिमियाबाबतची २३ लाखांहून अधिक स्कॅन पूर्ण केली असून ‌‘ॲनिमियामुक्त भारत' आणि ‌‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' यांसारख्या प्रमुख शासकीय उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेद्वारा प्रमाणित हे उपकरण भारताव्यतिरिक्त इतर तीन विकसनशील देशांमध्ये देखील वापरले जात आहे. ‌‘इझीआरएक्स'चे संस्थापक महापात्रा यांची आता याबाबत अधिक व्यापक संशोधन करण्याची कल्पना आहे, ज्यामुळे बोटांच्या स्कॅनद्वारे रक्तातील ग्लुकोज आणि बिलिरुबिनही मोजता येऊ शकेल. ‌‘आर्थिक विषमतेतील दरी कमी करण्यासाठी विविध उपाय शोधण्याच्या नवकल्पनांवर भर देणे या अंजनी माशेलकर फाऊंडेशनच्या ध्येयाशी पूर्णतः सुसंगत अशी ही कल्पना आहे.


सम्बन्धित सामग्री