नागपूर: आज नागपूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय 'लाडकी बहीण' योजनेच्या कार्यक्रमात एक मोठा राजकीय वाद उफाळला आहे. आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रम संपवून रवाना झाले.
नागपूर येथील रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिराच्या बाजूला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. पण कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार हे त्यांच्या पक्षाच्या बैठकीसाठी रवाना झाले.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची वाहनांची पार्किंग हेडगेवार स्मृती मंदिरात करण्यात आली होती, परंतु अजित पवारांनी समाधीस्थळाला अभिवादन न करता थेट निघून गेले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र कार्यक्रमानंतर डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले.
या वादग्रस्त घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय संबंध तणावपूर्ण होतात की काय असे चित्र सध्याला दिसत आहे. पवार यांच्या या अशा वर्तनामुळे माध्यमांसह राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच पुढील काही दिवस हा विषय चर्चेचा ठरू शकतो असे वातावरण आहे.