भोपाळ : पती-पत्नी यांच्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरील वादांवर न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असते. यामध्ये पोटगीसंबंधीची प्रकरणांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. दरम्यान, व्याभिचाराचा मुद्दा उपस्थित करत पत्नीला पोटगी नाकारल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय (High Court on Adultery) दिला आहे.
अनेकदा पत्नीला पोटगी नाकारण्यासाठी पतीकडून पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला जातो किंवा तसा संशय व्यक्त केला जातो. तसेच, पत्नी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असल्याचे सांगितले जाते. मात्र, पत्नीचे तिच्या पतीव्यतिरिक्त इतर कोणाबरोबर प्रेम किंवा स्नेहाचे नाते असणे गैर नाही. तसेच, हे पोटगी नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा - Viral Video : मांडीवर लॅपटॉप.. चारचाकी चालवत महिला करत होती ऑफिसचं काम, पोलिसांनी शिकवला धडा
'केवळ प्रेमाचे किंवा स्नेहाचे नाते असणे हा व्यभिचार ठरत नाही. जोपर्यंत ती त्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवत नाही, तोपर्यंत तो व्यभिचार ठरत नाही,' असा निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात पतीच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता की, त्याची पत्नी दुसर्या कोणावर तरी प्रेम करत असल्याने तिला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. या प्रकरणात निर्णय देताना न्यायमूर्ती जी.एस.अहलुवालिया यांनी, “व्यभिचार असल्याचे सिद्ध होण्यासाठी लैंगिक संबंध असणे आवश्यक आहे”, असे म्हटले आहे.
कुटुंब न्यायालयाने पत्नीला 4 हजार रुपयांची अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मात्र, या आदेशाविरुद्ध पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पुनर्विचार याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.
हेही वाचा - WAQF Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा काय आहे? संसदेत इतका गोंधळ कशासाठी?
न्यायालयाने काय म्हटले?
'जरी पत्नीचे शारीरिक संबंधांशिवाय कोणाबरोबर प्रेम आणि जिव्हाळ्याचे संबंध असतील, तरी पत्नी व्यभिचार करत असल्याचे मान्य करण्यास ते पुरेसे नाही', असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.
हल्ली छोट्या-मोठ्या वादांवरून, काही अपेक्षा किंवा पसंतीच्या मुद्द्यांवरून तसेच, पुरावा नसताना क्षुल्लक संशयावरून घटस्फोट मागण्यासाठी अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल होत आहेत. अशा स्थितीत न्यायालयाने महिलांना संरक्षण देण्यासाठी पावले टाकत हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
याशिवाय, पुढे न्यायालयाने म्हटले की, 'पतीचे उत्पन्न कमी असणे पोटगी नाकारण्यासाठी आधार ठरू शकत नाही. आपल्या स्वत:च्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची क्षमता नसल्याचे चांगल्या प्रकारे माहिती असताना देखील याचिकाकर्त्याने संबंधित मुलीशी लग्न केले असेल, तर त्याला तो स्वत: जबाबदार आहे. पण तो सक्षम व्यक्ती असेल तर त्याने त्याच्या पत्नीचे पालनपोषण करण्यासाठी किंवा पोटगीची रक्कम देण्याकरिता काहीतरी पैसे कमवले पाहिजेत'.