बचावकार्यासाठी लष्कर, एनडीआरएफ आणि तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय
हैदराबाद : तेलंगणामधील श्रीशैलम लेफ्ट बैंक कॅनॉल (एसएलबीसी) प्रकल्पाच्या बोगद्याच्या छताचा भाग शनिवारी कोसळल्याने आठ जण आत अडकले. या दुर्घटनेची माहिती राज्याचे सिंचन मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी दिली आहे. अडकलेल्यांमध्ये दोन अभियंते, दोन मशीन ऑपरेटर आणि चार कामगारांचा समावेश आहे.
तेलंगणा सरकारने बचावकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून, उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेत सहभागी झालेल्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. तसेच लष्कर व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) मदतही मागण्यात आली आहे, असे मंत्री रेड्डी यांनी सांगितले.
बोगद्याच्या आत तब्बल 14 किमी अंतरावर हे आठ जण अडकले आहेत. पाणी आणि मातीची गळती सुरू झाल्यानंतर कामगारांना बाहेर पडण्याचा प्रयत्न करता आला नाही. काही कामगारांनी बाहेर येण्याआधी भूगर्भीय अस्थिरता जाणवली आणि मोठा आवाज ऐकू आला. मात्र, बोगद्याच्या आत बोरिंग मशीनच्या पुढे कार्यरत असलेले श्रमिक तिथेच अडकले, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार आठ जणांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बचावकार्य जलद करण्यासाठी उत्तराखंडमध्ये यापूर्वी अशाच प्रकारच्या दुर्घटनेत मदत केलेल्या तज्ज्ञांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, अग्निशमन सेवा व आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून, भूगर्भीय हालचाली स्थिर झाल्यावर त्यांना आत पाठवले जाणार आहे.
सिंगरेणी कोलीरीज कंपनी लिमिटेडचे 19 सदस्यांचे विशेष पथक श्रीशैलम बोगद्याच्या दिशेने रवाना झाले आहे. लष्कर, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी सतत परिस्थितीचा आढावा घेत आहे. अडकलेल्या श्रमिकांना बाहेर काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने योजना तयार केली जात आहे.
राज्यातील महत्त्वाच्या पाणलोट क्षेत्रातील एसएलबीसी प्रकल्पात ही दुर्घटना घडल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजनांवरही विचार केला जात आहे.