नवी दिल्ली : राजकीय पक्ष म्हणून तुमची स्वतंत्र ओळख असून त्याच आधारावर तुम्ही राज्यातील विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. स्वत:च्या पायावर उभे राहून निवडणूक लढवा. निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांची छायाचित्रे वा चित्रफितींचा वापर करू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठणकावले. निवडणूक चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबतचा ठळक उल्लेख अजित पवार गटाने प्रचाराच्या जाहिरातींमध्ये केला पाहिजे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, असेही न्या. सूर्यकांत व न्या. उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने अजित पवार गटाला सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काही नेत्यांच्या दिशाभूल करणाऱ्या ट्वीटचा फटका शरद पवार गटाला बसण्याचा धोका असल्याचा मुद्दा शरद पवार गटाचे वकील सिंघवी यांनी उपस्थित केला होता.