Weather Update: देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक भागात उन्हाचा पार वाढला असताना काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) देशात पुन्हा एकदा हवामानाशी संबंधित इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम बर्फवृष्टीची आणि पावसाची शक्यता आहे. उर्वरित ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा -
एका पश्चिमी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 15 ते 16 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळे निर्माण होतील. तसेच बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 4 दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय, 17 मार्च दरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे 40-50 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील आणि वादळासह मुसळधार पाऊस पडेल.
हेही वाचा - 'हे धोकादायक मानसिकतेचे लक्षण'; अर्थसंकल्पातून रुपया चिन्ह हटवल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची तामिळनाडू सरकारवर टीका
दरम्यान, पुढील 24 तासांत वायव्य भारतातील मैदानी भागात आणि पुढील 48 तासांत मध्य भारतातील कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. पुढील 4-5 दिवसांत पश्चिम भारतातील काही भागात कमाल तापमान हळूहळू 2-4 अंश सेल्सिअसने कमी होईल, तर पुढील 3 दिवसांत पूर्व भारतातील कमाल तापमान सुमारे 2-3 अंश सेल्सिअसने वाढेल.
या राज्यांमध्ये तापणार उष्णतेचा पारा -
हवामान विभाहाने दिलेल्या माहितीनुसार, 15-17 मार्च रोजी ओडिशामध्ये, 15-17 मार्च रोजी झारखंडमध्ये आणि 15-17 मार्च रोजी पश्चिम बंगालमधील गंगेच्या किनारी भागात उष्णतेची लाट येईल. गुजरात आणि राजस्थानमध्ये कमाल तापमान 40-42 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले, तर ओडिशा, कोकण आणि गोव्यात कमाल तापमान 38-40 अंश सेल्सिअस राहण्याच अंदाज आहे.
हेही वाचा - Earthquake in Ladakh: होळीच्या दिवशी देशात 2 ठिकाणी भूकंप; लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
दिल्ली-एनसीआर हवामान अंदाज -
दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत दिल्ली एनसीआरमध्ये किमान तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे आणि कमाल तापमानात 1 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. 15 ते 16 मार्च या पुढील दोन दिवसात राजधानीत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.