Manipur CM N Biren Singh Resigns
Edited Image
Manipur CM N Biren Singh Resigns: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, राज्यातून मोठ्या बातम्या समोर येत आहेत. इंफाळमधील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना राजीनामा पत्र सादर केले. आज सकाळी एन बिरेन सिंह यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
हेही वाचा - 2026 पूर्वी नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करू; अमित शहा यांचे आश्वासन
एन बिरेन सिंह यांनी राजीनामा देताना काय म्हटलं?
राज्यपालांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मी, नोंगथोम्बम बिरेन सिंह, मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मणिपूरच्या लोकांची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मणिपूरच्या प्रत्येक नागरिकाचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारच्या वेळेवर केलेल्या कृती, हस्तक्षेप, विकास कामे आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. केंद्र सरकारला माझे प्रामाणिक आवाहन आहे की, त्यांनी अशाच पद्धतीने काम करत राहावे. मी तुमच्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडू इच्छितो-
- हजारो वर्षांचा समृद्ध आणि सुसंस्कृत इतिहास असलेल्या मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखली पाहिजे.
- सीमेवरील घुसखोरी थांबवावी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्यासाठी धोरण बनवावे.
- अंमली पदार्थांच्या व्यसन आणि अंमली पदार्थांच्या दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच ठेवली पाहिजे.
- एमएफआरची एक नवीन कडक आणि पूर्णपणे सुरक्षित प्रणाली लागू करावी ज्यामध्ये बायोमेट्रिक पडताळणी काटेकोरपणे केली पाहिजे.
- सीमेवरील काम वेळेवर आणि जलद गतीने सुरू ठेवावे.
हिंसाचारामुळे बिरेन सिंग यांच्यावर दबाव -
मणिपूरमध्ये मे 2023 पासून जातीय हिंसाचार सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये, मणिपूरमधील जिरीबाम येथे तीन महिला आणि त्यांच्या तीन मुलांची हत्या झाल्यानंतर गोंधळ उडाला होता. राज्यात सतत सुरू असलेल्या हिंसाचारामुळे एन. बिरेन सिंग यांच्यावर प्रचंड दबाव होता आणि त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरत होती. एनडीएचा सहयोगी पक्ष एनपीपीनेही मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता. तसेच नेतृत्व बदलण्याची मागणी केली होती.
हेही वाचा - दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपात जोरदार रस्सीखेच; मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नावांची चर्चा
राज्यातील जातीय हिंसाचाराबद्दल मागितली जनतेची माफी -
दरम्यान, गेल्या वर्षाच्या अखेरीस, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यातील जातीय हिंसाचाराबद्दल लोकांची माफी मागितली होती. त्यांनी म्हटलं होतं की, हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. अनेकांनी त्यांचे प्रियजन गमावले. अनेक लोक आपली घरे सोडून गेले. मला याबद्दल वाईट वाटते. गेल्या तीन-चार महिन्यांतील शांततापूर्ण परिस्थिती पाहून, मला आशा आहे की, 2025 मध्ये राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत होईल.