पटणा (बिहार), 13 मार्च (ANI): बिहारच्या पटणामधील बोरिंग रोड चौकाजवळील बाजारपेठा सध्या होळीच्या तयारीने गजबजलेल्या आहेत. पारंपरिक पिचकाऱ्यांबरोबरच यंदा मोदी आणि योगी यांच्या प्रतिमांनी सजवलेल्या पिचकाऱ्यांना विशेष मागणी आहे.बाजारात विविध आकारातील अनोख्या पिचकाऱ्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये लाटण्याच्या आकारातील, हातोड्यासारख्या तसेच इंग्लंडचा प्रसिद्ध ब्लोहॉर्नच्या आकारातील पिचकाऱ्यांचाही समावेश आहे.
खरेदीसाठी आलेल्या गुलशन कुमार यांनी ANI शी बोलताना सांगितले, "प्रत्येक जण आपल्या पद्धतीने होळी साजरी करतो, पण आम्ही यंदा काहीतरी वेगळं करणार आहोत. मोदी आणि योगी यांच्या प्रतिमांसह असलेल्या पिचकाऱ्यांनी होळी साजरी करणं हा एक वेगळाच अनुभव आहे.' मात्र, दुसऱ्या एका ग्राहकाने वेगळं मत मांडलं. शैलेश कुमार म्हणाले, "पिचकारीवर कोणाचंही छायाचित्र असो, फरक पडत नाही. राजकारणी असो किंवा कार्टून कॅरेक्टर, अखेरीस ती फक्त विक्रीसाठी असते.'
हेही वाचा: उत्तर प्रदेशात रंगपंचमीच्या निमित्ताने मशिदींवर ताडपत्री, धार्मिक वाद होऊ नये म्हणून योगी सरकारचा निर्णय
यंदा मागील वर्षांच्या तुलनेत बाजार मंद असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, पिचकाऱ्यांना मागणी कमी झालेली नाही. त्या ₹500 ते ₹2000 पर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. विशेषतः 'मोदी पिचकाऱ्या' जोरदार खपल्या जात आहेत.व्यापारी शिवरतन मालाकार यांच्या मते, 'मोदी पिचकाऱ्यांची' मागणी प्रचंड आहे. मोदी मुखवटेही आले असून त्यांनाही चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मोदी मुखवटे साधारण ₹100 मध्ये विकले जात आहेत."
देशभरात होळीचा उत्साह वाढत असताना, विविध ठिकाणी पारंपरिक विधींसह रंगपंचमीच्या तयारीला वेग आला आहे. मथुरा-वृंदावनमध्ये होळीचा पारंपरिक रंग दिसून येतो, तर जयपूर, दिल्लीसारख्या शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुलाल आणि रंगांची उधळण होत आहे.