Thursday, April 10, 2025 08:45:10 AM

Bijapur Naxalite Killed : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक, जवानांकडून १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात ४ भारतीय जवान गंभीर जखमी झाले. यातील २ जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

bijapur naxalite killed  महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक जवानांकडून १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची नक्षलवाद्यांसोबत जोरदार चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या घटनेत ४ भारतीय जवान गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील २ जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते.  

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रावती राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात बिजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेजवळ महाराष्ट्राच्या सीमा भागाजवळ चकमक झाली. सुरक्षा दलाच्या जवानांची एक टीम अँटीनक्षल ऑपरेशनवर होती. तेव्हा त्यांचा सामना नक्षलवाद्यांशी झाला. भारतीय जवान आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात भारतीय जवानांनी नक्षलवाद्यांवर जोरदार हल्ला करत १२ नक्षलवाद्यांना ठार केले.  

या घटनेविषयी बस्तर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चकमकीत मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. भारतीय जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून ऑटोमॅटिक शस्त्रही जप्त केली आहेत. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांविरोधात सतत कारवाई केल्या जात आहेत. डीआरजी बिजापूर, एसटीएफ, सी-६० च्या जवानांनाकडून या परिसरात शोध मोहिम सुरू आहे.

बिजापूरमध्येच १ फेब्रुवारी २०२५ रोजी गंगालूर परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले होते. याशिवाय मागील महिना जानेवारी २०-२१ तारखेला छत्तीसगड आणि ओडिशा सीमा भागात गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले होते. ज्यात ९० लाख रूपयांचा इनामी नक्षलवादी चलपतीही होता.

दरम्यान, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलविरोधी जोरदार मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत भारतीय जवानांनी ५० हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. छत्तीसगड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर विविध चकमकीत सुरक्षा दलांनी २१९ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.  


सम्बन्धित सामग्री